सुस्वागतम...सुस्वागतम्...ज्ञान सिध्दी या ब्लॉगवर मी श्री.चौगुले पोपटराव रामचंद्र- उपशिक्षक (जि.प.प्राथ.शाळा धामणे ता.-मावळ जि.-पुणे) आपले हार्दीक स्वागत करीत आहे.......

सर्व शिक्षक बंधू व भगिनींना विनंती आहे की,फक्त शैक्षणिक उपयोगिताकरिता/शाळेतील शिक्षक,विध्यार्थी यांची गुणवत्ता वाढविण्यासाठी/माहितीसाठी ब्लॉगचा वापर करावा.

शिक्षकाची भूमिका



आज देशाला वैज्ञानिक आणि मानवतावादी वृत्तीची आध्यात्मिकता असलेल्या शिक्षकांची आवश्यकता आहे; परंतु असे शिक्षण शिक्षकांनाच प्रशिक्षणात दिले जात नाही. त्यामुळे ते विद्यार्थ्यांना घडवण्यात न्यून पडतात. सर्वच शिक्षकांना मार्गदर्शक ठरावीत, अशी सूत्रे लेखात दिली आहेत.

१. विचार आणि विवेक हे दोन्ही दृष्टीकोन असलेला
माणूसच यशाचे शिखर गाठू शकणे

'विचार आणि विवेक ही प्रगतीची कारणे आहेत', अशी शिकवण आपण त्यांना दिली पाहिजे. त्यांच्यामध्ये वैज्ञानिक वृत्ती निर्माण व्हावयास हवी. कोणत्याही प्रश्नांविषयी आपण वैज्ञानिक दृष्टीकोन बाळगायला हवा आणि या वैज्ञानिक दृष्टीकोनाची मानवतावादी दृष्टीकोनाशी सांगड घालता यायला हवी. हे दोन्हीही दृष्टीकोन असलेला माणूसच स्वकष्टाने यशाचे शिखर गाठू शकतो.
हे विज्ञान शिक्षकाचेच कार्य नाही, तर सर्वच शिक्षकांचे कार्य आहे. मुलांमध्ये या दोन्ही प्रेरणा आपण ज्या वेळी निर्माण करू शकू, त्या वेळी आपल्या राष्ट्राचा महान आध्यात्मिक आणि सांस्कृतिक वारसा समजून घेण्याची पात्रता त्यांच्यात निर्माण होईल. लोकांच्या जीवनात ते चैतन्य आणि आनंद निर्माण करू शकतील.

२. राष्ट्राची खरी संपत्ती म्हणजे देशात
मानवी ऊर्जेचे स्रोत निर्माण होणे

तर्कसंगत प्रश्न् विचारण्यावर वेदांताने नेहमीच भर दिला आहे; म्हणून अशी चिकित्सक, वैज्ञानिक आणि सत्यशोधक वृत्ती मुलांमध्ये वाढीस लागेल, यावर आपल्या शिक्षणपद्धतीत जोर द्यायला हवा. 'सत्य काय ? सत्य जीवन कसे असते ? आणि मिथ्या गोष्टी सोडून सत्य गोष्टी आपल्या जीवनात कशा आणता येतील ?, अशा प्रकारची शोधक अन् जिज्ञासू वृत्ती आपल्या मुलांमधील अनेक सुप्त शक्तींना चेतवू शकेल, अशा रीतीने आपल्या मुलांच्या वृत्तीत पालट होऊ शकला, तर राष्ट्राची खरी संपत्ती, म्हणजे मानवी ऊर्जेचे स्रोत आपल्या देशात निर्माण होतील. यालाच मानव संसाधनविकास म्हणता येईल. यामुळे आपले राष्ट्र अधिक महान बनेल.

३. शिक्षणाचा आत्मा

मनुष्यातील ऊर्जा स्रोत संवर्धित करायचा आणि त्या स्रोताला मानवतावादी दिशा द्यायची, हे सारे शिक्षणाद्वारे विद्यार्थ्यांत यायला हवे.

४. विद्यार्थ्यांविषयी पुढील गोष्टी लक्षात घेणे आवश्यक !

अ. विद्यार्थी पाठ्यपुस्तकांतच घोटाळणार नाहीत, इकडे लक्ष द्या.
आ. त्यांना ग्रंथालयात जाणे आणि अधिकाधिक ज्ञानकण ग्रहण करणे, यांसाठी प्रेरित करा.
इ. त्यांना अधिक आणि नेमके ज्ञान मिळेल, इकडे लक्ष द्या.
ई. विद्यार्थ्यांनी ग्रंथ वाचल्यावर त्यांना त्यावर विचार करायला शिकवा.
उ. आपले शिक्षक आणि अन्य विद्यार्थी यांच्यासह चर्चा करायला त्यांना प्रेरित करा.
ऊ. शिक्षक हा केवळ शिकवत नसतो, तर विद्यार्थ्यांत स्वतंत्रपणे ज्ञान ग्रहण करण्याची क्षमता निर्माण करत असतो.
५. देशाच्या इतिहासातील आरंभीची ३००० वर्षे एकत्रितपणे महान संस्कृती निर्माण करणारे आपल्या देशातील विद्यार्थी आणि शिक्षक विद्यार्थी या संस्कृत शब्दाची फोड विद्या आणि अर्थिन् अशी आहे. ज्ञान आणि ते मिळवणारा, असा त्याचा अर्थ आहे. असे विद्यार्थी अन् शिक्षक भारतात होते. त्यांनी आपल्या देशाच्या इतिहासातील आरंभीची ३००० वर्षे एकत्रितपणे एक महान संस्कृती निर्माण केली. त्यानंतर एक सहस्र वषार्र्ंच्या काळात एकप्रकारचा साचलेपणा आल्यामुळे सर्व ज्ञानप्रवाह कुंठित झाले. या अवस्थेतून आता आपण आपली सुटका करून घेण्यास आरंभ करायचा आहे.
६. शिक्षकीपेशा हे सतीचे वाण आहे; म्हणून शिक्षकांनी
ज्ञानार्जन आणि ज्ञानप्रसार याला वाहून घेणे आवश्यक !
जे अन्य क्षेत्रांत अपयशी होतात, त्यांनी शेवटी शिक्षकी पेशा स्वीकारावा, असे आपल्या शिक्षकांच्या संबंधी घडू नये. उत्कृष्ट बुद्धीच्या लोकांना शिक्षकी पेशाचे आकर्षण वाटावयास हवे. एकदा या क्षेत्रात आल्यावर त्या व्यक्तीला आपण स्वतः आणि आपला पेशा यांविषयी आत्मविश्वास आणि आत्मीयता वाटावयास हवी. शासनानेसुद्धा 'उत्कृष्ट दर्जाचे लोक शिक्षकी पेशाकडे कसे वळतील', हे पाहिले पाहिजे. 'बदमाशांसाठी देशभक्ती हेच अखेरचे आश्रयस्थान आहे' (पॅट्रिऑटिझम् इज दि लास्ट रेफयूज ऑफ द स्काउंड्रल'), असे इंग्लंडमध्ये १८ व्या शतकात म्हटले जात होते. त्याच धर्तीवर समाजात 'सर्वतोपरी अपयशी ठरलेली व्यक्तीच शिक्षणक्षेत्रात येते', हा समज आता भारतात खोटा ठरावा. शिक्षकीपेशा हे एक सतीचे वाण आहे. शिक्षकांनी ज्ञानार्जन आणि ज्ञानप्रसार याला वाहून घ्यावयास हवे.
- स्वामी रंगनाथानंद
संदर्भ : मासिक 'जीवन विकास', सप्टेंबर 2007









          

No comments:

Post a Comment